अखेर पुण्याचा महापौर ठरला! भाजपचं धक्कातंत्र, अनुभवी नगरसेविकेच्या नावावर शिक्कामोर्तब

महापालिका निवडणूक निकालाला दोन आठवडे उलटून गेल्यानंतर आता अखेर भाजपकडून पुण्याच्या महापौरपदासाठीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने काल महापौरपदासाठी वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे आणि मानसी देशपांडे यांच्या नावाची शिफारस केली होती. महापौरपदाच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम मोहोर उमटवली गेली असून मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार आहे.

पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवड बिनविरोध होण्याची शक्यता असून उपमहापौर पद रामदास आठवले यांच्या आरपीआयला दिलं जाणार आहे. पुरेसं संख्याबळ नसल्याने महापौरपदासाठी अर्ज दाखल न करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची तर उपमहापौरपदी आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आवाजी मतदानाने महापौरांची निवड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *