राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही वेगवान घडामोडी सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत दावे केले जात आहेत. अजित पवार हयात असताना आमची त्यांच्यासोबत अनेकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती आणि लवकरच याबाबतची घोषणा करण्याचे निश्चित झाले होते, असं पवारांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तसंच दोन्ही पक्षांचे विलीनीकरण ही अजितदादांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण होवो, अशी आमची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत असलेले शरद पवार हे आपला दिल्ली दौरा रद्द करून अचानक बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत पवार आणि अदानींमध्ये जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाली होती. गौतम अदानी यांच्याकडून मागाील काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी झालेला अदानी यांचा बारामती दौरा आणि त्यानंतरची डिनर डिप्लोमसीदेखील चर्चेत आली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या निधनानंतर अदानी यांनी घेतलेली शरद पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पु्ढील काही दिवस त्या बारामती इथं असणार आहेत. त्यानंतर आता शरद पवार हेदेखील दिल्ली दौरा रद्द करून पुन्हा बारामतीकडे गेल्याने पवार कुटुंबात राजकीय एकीसाठी चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
