विषारी पेढा खाल्ल्यामुळे आजोबा-नातीसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघा नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. मयत खुशबूने तिच्या सासरच्या मंडळींवर केलेल्या आरोपांमुळे समाजात त्यांची मोठी बदनामी झाली होती. त्यामुळे सासरे, दीर आणि नणंद यांनी खुशबूवर विषप्रयोग करण्याचा कट रचला.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबूचा विवाह जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. मात्र सासरी आपला छळ होत असल्याचा आरोप केला होता. सुनेच्या आरोपांमुळे चारचौघात बदनामी झाल्याच्या भावनेतून खुशबूचे सासरे झाडू केसर, दीर शुभम आणि नणंद शिवानी यांनी विषारी पेढे देऊन तिचा काटा काढण्याचा प्लॅन रचला.
कटानुसार आरोपींनी खुशबूच्या वडिलांच्या दुकानावर आरोपींनी एक पिशवी टांगली. त्यामध्ये सोमल (आर्सेनिक) मिसळलेले पेढे होते. आधी वॉचमन दशरु यदुवंशी याने पेढा खाल्ला आणि त्याचा मृत्यू झाला.
खुशबूच्या कुटुंबातील चौघांना विषबाधा
खुशबूच्या आईला याविषयी समजलं नव्हतं. तिने पेढ्यांचा डबा दुकानातून घरी आणला. त्यावेळी खुशबू, तिची बहीण पूजा, त्यांची आई आणि खुशबूच्या आजोबांनी पेढा खालला. त्यामुळे चौघांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान खुशबू आणि आजोबा या दोघांनी प्राण सोडले, तर पूजा आणि तिच्या आईची तब्येत स्थिर आहे.
आरोपींनी पेढ्यात वापरलेले सोमल हे स्थानिक जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वापरतात. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत पेढ्यातील आर्सेनिकची पातळी सामान्यापेक्षा एक हजार पट अधिक असल्याचे आढळले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या.
५७ वर्षीय झाडू केसर, त्यांचा २४ वर्षीय मुलगा शुभम आणि २२ वर्षीय मुलगी शिवानी यांना अटक करण्यात आली आहे. हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली तिघांवर कारवाई करण्यात आली.
