महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी (सोमवारी) सुनेत्रा पवार कराड दौऱ्यावर आल्या. दिवंगत अजितदादांसारखाच वक्तशीरपणा त्यांच्यात यावेळी पाहायला मिळाला. ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केलं. परंतु, माध्यमांशी संवाद साधणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पहिलाच दौरा निःशब्द ठरला.
सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता त्या कराडमध्ये दाखल झाल्या. शासकीय विश्रामगृहात अर्धा तास थांबून बरोबर 10 वाजता त्या प्रीतिसंगमावर पोहोचल्या. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलण्याचे त्यांनी टाळले.
अजित दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणयांच्या प्रीतीसंगमावर नतमस्तक झाल्या. दिवंगत अजित पवार नेहमीच प्रीतीसंगमाला भेट देत आले असून, त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच यशवंतराव चव्हानांच्या विचारधारांचं पालन करत आले आहेत. कराडसह आज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फलटनला देखील भेट देणार आहेत.
