संभाजीनगरातून एक फिल्मी स्टाईल घडामोड समोर येते आहे. हा स्टोरी ऐकून तुम्हाला एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल. पण तसं नाही आहे. हि घडामोड अगदी खरी आहे. खऱ्या जीवनातील आहे.शहरातील गजबजलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निराला बाजार परिसरात एका पान टपरीचालकाला पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिगारेट आणि ५ हजार रुपयांच्या मागणीवरून सुरू झालेला हा वाद थेट प्राणघातक धमकी आणि लुटीपर्यंत पोहोचला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहील चांडक, करण गणेश तांदळे रा. दगडगल्ली, औरंगपुरा,जय भांडारकर, रितेश पहाडिया असे आरोपींचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निराला बाजारमधील अशोका रेस्टॉरंटच्या शेजारी आशिष रामेश्वर काष्टे यांची ‘जय भवानी पान सेंटर’ नावाची टपरी आहे. १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काही तरुण दुचाकीवरून तिथे आले.आरोपी साहील चांडक याने फिर्यादीला धमकावत, “करणला ५ हजार रुपये आणि सिगारेट दे,” असे सांगितले. मात्र, टपरीचालकाने पैसे देण्यास नकार दिला आणि वादाला तोंड फुटले.
पिस्टल आणि चाकूचा धाक…
नकार मिळताच आरोपींचा पारा चढला. आरोपी करण तांदळे याने चाकू काढून तर जय भांडारकर याने थेट पिस्टल (बंदूक) रोखून टपरीचालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. दिवसाढवळ्या भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
पैसे हिसकावून घेतले
केवळ धमकावूनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीला ढकलून देऊन टपरीच्या गल्ल्यातील ७ हजार रुपये रोख आणि सिगारेटची पाकिटे बळजबरीने हिसकावून घेतली. “पोलिसात तक्रार केली तर घरच्यांना संपवून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, अशा पद्धतीच्या गुन्हेगारी घटना या सर्वांसमोरील मोठं आव्हान ठरलं आहे. समाजातील वाढती गुन्हेगारी त्यामागिल कारणे आणि त्यांची मीमांसा हा देखील एक मोठा चर्चेचा विषय बनतो आहे.
