मुंबईत एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीने लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथून अंदाजे ४०० फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रेया नरेंद्र पटी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तब्बल ३६ तासांच्या शोधानंतर लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करत खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली होती.
मुंबईत वास्तव्यास असलेली श्रेया ३१ जानेवारी रोजी ‘ट्रेकिंगला जात आहे’ असे सांगून घरातून बाहेर पडली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती लोणावळ्यात पोहोचली. सुरुवातीला ती ड्युक्स नोज येथे गेली. काही वेळानंतर ती खाली उतरली आणि रिक्षाने टायगर पॉईंट येथे गेली. टायगर पॉईंट येथील एका स्टॉलच्या पाठीमागे तिने आपली बॅग ठेवली होती.
टायगर पॉईंट परिसरात कठड्याजवळ असलेल्या तुटलेल्या तारेच्या कुंपणातून तिने थेट ४०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत श्रेया घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा मोबाईल बंद होता.
दरम्यान, काही वेळाने स्टॉलच्या पाठीमागे ठेवलेली बॅग दुकानदाराच्या लक्षात आली. बॅगेतील ओळखपत्रावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्याने माहिती दिली. त्यानंतर श्रेया बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत लोणावळ्यात दाखल झाले. श्रेया एकटीच आली होती का, तिच्यासोबत कोणी मित्र-मैत्रीण होते का, याची चौकशी करण्यात आली; मात्र ती एकटीच आल्याचे निष्पन्न झाले.
बॅगेतील कपड्यांच्या आधारे डॉग स्क्वॉडने ज्या ठिकाणाहून तिने उडी घेतली त्या ठिकाणापर्यंत पोलिसांना नेले. टायगर पॉईंट परिसर अत्यंत खोल व दुर्गम असल्याने शोधकार्य आव्हानात्मक होते. दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली. लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमही शोधात सहभागी झाली होती.
