लोकल तिकिट काढणं होणार अधिक सुलभ, रेल्वे स्थानकांवर 325 नवे ATVM बसवणार; कुठे-कसा होणार फायदा?

मुंबई उपनगरीय रेल्वेचे तिकीट घेणे आता अधिक सुलभ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात ३२५ नवे एटीव्हीएम कार्यान्वित करण्यात येत आहेत. नव्या एटीव्हीएममधून तिकीट घेणे आणि डिजिटल पद्धतीने ऑनलाइन पैसे भरण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होणार आहे.

‘मेरा टिकट मेरी शान, विकसित भारत के लिए मेरा योगदान’ अभियानाचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी चर्चगेट स्थानकात नुकतेच केले. रेल्वेस्थानकात तिकीट खिडकीवरील रांगा कमी करण्यासह प्रवाशांना सहज तिकीट मिळावे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘तिकीट घेऊन प्रवास करणारा प्रवासी रेल्वेच्या आधुनिकीकरणासह, राष्ट्र निर्माणात भूमिका बजावतो. यामुळे प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा’, असे प्रदीप कुमार म्हणाले. पश्चिम रेल्वेत विद्यमान ५०१ एटीव्हीएम कार्यरत आहेत. उपनगरी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीसह पादचारी पुलावरदेखील एटीव्हीएम बसवण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ११० एटीव्हीएमचे आयुर्मान पूर्ण झाल्याने ते बदलण्यात येतील. उर्वरित एटीव्हीएम नव्या जागेवर ठेवण्यात येणार आहेत.

प्रवासी यूपीआय आणि अन्य डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करून तिकीट काढू शकतील. यामुळे वेळेची मोठी बचत होते. डिजिटल पेमेंटमुळे रोकडीची गरज भासत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ‘रेल वन’ हे मोबाइल अॅपही सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवासी स्मार्टफोनवरून ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकतात. पूर्वी बसवण्यात आलेल्या एटीव्हीएम मशीन अनेकदा स्थानकांवर बंद अवस्थेत आढळून येत होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता, अनेक प्रवाशांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे. नव्या मशीनमधून तिकीट अधिक जलद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *