राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक अपात्र; रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे खळबळ

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 नगरसेवक अपात्र ठरले आहेत.  रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्षात म्हसळ्यातील सात नगरसेवकांचा राजकीय बळी गेला आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सात नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत. नगरसेवक कमल जाधव, मेहजबिन दळवी, असहल कादिरी, फारहीन बशारत , सुमय्या आमदानी, सारा म्हसलाई आणि शाहिद जंजिरकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई झालेल्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात नगर सेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता.
या सर्वांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यांना अपात्र ठरवावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

KDMC मधील नगरसेवक बेपत्ता

KDMC मधील शिवसेना उबाठाचे चार नगरसेवक अजूनही बेपत्ता आहेत.  बेपत्ता नगरसेविका स्वप्नाली केने यांच्या घराबाहेर लावले “कारणे दाखवा नोटिस”चे फलक लावले आहेत. 24 तासात बैठकीस गैरहजर राहिल्याबाबाबत खुलासा करा अन्यथा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचा इशारा उबाठा गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.  शिवसेना शिंदे पक्षाचे महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत गायब असलेले चार नगरसेवक अर्ज भरताना उद्या उपस्थित राहणार का हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *