राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक वेळापत्रकात बदल (Zilla Parishad Election Date) केल्याने राज्यभरातील शिक्षकांची मोठी कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. तर शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीटीईटी (CTET Exam) परिक्षेदिवशीच मतदान असल्याने निडणुकीच्या ड्युटीसाठी शिक्षकांचीच परीक्षा असणार आहे. दरम्यान, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील शिक्षकांची सीटीईटी परीक्षा (Gram Panchayat Zilla Parishad Election 2026) आहे. त्यामुळे शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करून अन्य व्यवस्था करावी, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता यावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र वेळापत्रकात बदल केल्याने राज्यभरातील निवडणूक कामास नियुक्त असलेल्या शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षकांची मोठी अडचण झाली आहे. या निवडणूका पुढे ढकलल्याने अनेक शिक्षकांची सीटीईटी (CTET Exam) परीक्षा बुडण्याची शक्यता आहे. यात मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर याठिकाणी परीक्षा होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच मतदान 7 फेब्रुवारी तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तर सीटीईटी 7 आणि 8 फेब्रुवारीला परिक्षा पार पडणार आहे. त्यामुळे 7 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांची परीक्षा बुडणार असल्याचे स्पष्ट आहे. तर 8 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांच सेंटर इतर जिल्ह्यात आलं तर त्यांनाही मतदान प्रक्रिया पुर्ण करुन परीक्षेला जाण शक्य होणार नाही. त्यामुळे शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करून अन्य व्यवस्था करावी, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केल्याने पाच फेब्रुवारीला होणार मतदान 7 फेब्रुवारीला, तर मतमोजणी 9 तारखेला राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे ही सीटीईटी पुढे ढकलावी, अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. मात्र ही परीक्षा केंद्र सरकारची असल्यामुळे जर ही परीक्षा पुढे ढकलायची असेल तर केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. एकीकडे न्यायालयाने ही परीक्षा बंधनकारक केलीय. तर दुसरीकडे निवडणूक ड्युटी असल्याने काय भुमिका घ्यावा, असा प्रश्न शिक्षकांच्या समोर आहे.
