कोकणात सर्पदंशाने यापूर्वी ही मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी म्हणजे काल घडला आहे. ग्रामीण भागातील एका गावात शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष असलेल्या महिलेनं सकाळी आनंदाने झेंडावंदन केलं. कार्यक्रमातही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मात्र, काल सोमवारी संध्याकाळी या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली आहे.
मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह
दापोली तालुक्यातील जांभुळनग येथील जयश्री जितेंद्र बर्जे (वय 37) असं या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जयश्री बर्जे यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा या नात्याने सकाळी शाळेत ध्वजारोहण केलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी आनंदाने सहभाग घेतला त्यांचा गौरवही करण्यात आला. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी काळाने त्यांच्यावर झडप घातल्यानं गावात हळहळ व्यक्त होत आहे. विषारी सर्पदंशामुळे जयश्री जितेंद्र बर्जे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. जयश्री बर्जे या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाला मदत करत होत्या.
घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी त्या गेल्या असता सायंकाळी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याचं लक्षात आलं. तीव्र वेदना होताच त्या धावत घरी आल्या व घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. जयश्री बर्जे यांच्या आकस्मिक निधनामुळे बर्जे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बर्जे कुटुंबावर महिन्यात दुसरा आघात
बर्जे कुटुंबावर अवघ्या एका महिन्यात दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री बर्जे यांचे सासरे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं. त्यानंतर आता जयश्री बर्जे यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्या या कुटुंबात जयश्री बर्जे या शेतमजूर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचे पती टेम्पोचालक म्हणून काम करतात. जयश्री बर्जे यांच्या पश्चात पती, सासू, तीन वर्षांची लहान मुलगी व अंगणवाडीत शिक्षण घेणारा लहान मुलगा असा परिवार आहे. आईच्या अकाली जाण्याने चिमुकल्यांचं मातृछत्र हरपलं आहे. या दुर्दैवी घटनेनं जांभुळनगर गावावर शोककळा पसरली आहे.
