रस्ते अपघात हे केवळ वाहतुकीशी संबंधित संकट नसून, ते एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. दरवर्षी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती हाच खरा मार्ग आहे. याच उद्देशाने सुरक्षा अभियान ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आणि सार्वजनिक आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी, शुश्रुषा संवर्ग व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील सभागृहात भव्य रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सुरक्षा अभियान राबवत असलेल्या या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा सहभाग सहकार्य मिळालेले आहे.
ही कार्यशाळा मा. उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई – डॉ. अशोक नंदापूरकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते सुरक्षा ही उपचारांपूर्वीची आरोग्य सेवा असल्याचे ठामपणे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा. श्री. सचिन पाटील (कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी क्र. १, ठाणे) व श्री. संजीव वानखेडे (उपविभागीय अभियंता) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सुरक्षित रस्ते बांधणी, अपघातप्रवण ठिकाणांची ओळख व प्रतिबंधात्मक अभियांत्रिकी उपाय याविषयी सखोल माहिती दिली.
या कार्यशाळेस जिल्हाशल्यचिकित्सक, ठाणे – डॉ. कैलास पवार आणि वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे – डॉ. नेताजी मुळीक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाधीक्षक डॉ. ममता आळसपुरकर आणि वर्ग-१ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्चना गडकरी यांच्या उपस्थितीमुळे मानसिक आरोग्य, अपघातानंतरचा ताण व पुनर्वसन या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर भूमिकानाट्य (Role Play), गट उपक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व चर्चासत्रांद्वारे सहभागींचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार व सुरक्षा अभियान ट्रस्टचे संस्थापक डॉ. विलास पवार यांनी रस्ते अपघातांमागील सामाजिक कारणे आणि माध्यमांची भूमिका अधोरेखित केली, तर ट्रस्टचे सचिव अॅड. विराट पवार यांनी कायदे, नागरिकांची जबाबदारी आणि जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.
मान्यवरांचे विचार
डॉ. अशोक नंदापूरकर:
“रस्ते सुरक्षा ही सार्वजनिक आरोग्याची पहिली पायरी आहे.”
डॉ. कैलास पवार:
“रस्ते अपघात टाळणे हे उपचारांपेक्षा मोठे सेवाकार्य आहे.”
डॉ. नेताजी मुळीक:
“प्रत्येक अपघातामागे एक कुटुंब असते; रस्ते सुरक्षा म्हणजे माणुसकीचे रक्षण.”
श्री. सचिन पाटील:
“सुरक्षित रस्ते हे केवळ बांधकाम नाही, तर जीवन वाचवणारी जबाबदारी आहे.”
डॉ. विलास पवार:
“रस्ते अपघात हे नशिबाचे नव्हे, तर निष्काळजीपणाचे परिणाम असतात. जनजागृती हीच खरी लस आहे.”
अॅड. विराट पवार:
“आज आरोग्य कर्मचारी शिकले, उद्या समाज वाचेल—हीच या कार्यशाळेची खरी यशोगाथा आहे.”
या कार्यशाळेला सर्व स्टाफ नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती लाभून सभागृह पूर्णपणे भरले होते. सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रश्नोत्तरांमधील सक्रीय सहभाग आणि सकारात्मक अभिप्रायामुळे ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी, प्रभावी आणि अनुकरणीय ठरली.
ही कार्यशाळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम न राहता, रस्ते सुरक्षेसाठी सजग समाज घडवण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

