गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी शीव उड्डाणपूल परिसरात वाहतूककोंडी होते. त्यामुळे शीव उड्डाणपुलाला समांतर असा उड्डाणपूल उभारण्याचा विचार मुंबई महापालिका पूल विभागाकडून सुरू होता. त्याआधी समांतर पूल उभारणी व्यवहार्य आहे की नाही, यावर व्हीजेटीआयकडून अभ्यास करण्यात आला. आता पूलउभारणी व्यवहार्य असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिला असल्याने लवकरच या कामाचे कार्यादेश दिले जाणार आहेत. शीव उड्डाणपुलाला समांतर पूल उभारणी झाल्यास ठाण्यातून सीएसएमटी परिसरापर्यंत जाणाऱ्या वाहनांना थेट पर्याय उपलब्ध होऊन हा प्रवास सुलभ होईल.
पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. दोन अधिक एक अशा वाहनमार्गाची व्यवस्था या पुलावर आहे. ज्यामध्ये ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे (उत्तर दिशेने) जाणाऱ्या वाहनांसाठी दोन वाहनमार्ग आणि दक्षिण मुंबईतील सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक मार्ग आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे शीव उड्डाणपुलाला समांतर असा उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय समोर आला.
