राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. अनेक शहरांमध्ये महिला महापौर बसणार असल्याचं या आरक्षण सोडतीमधून निश्चित झालं आहे. मुंबईमध्येही महिला महापौर बसणार असून ही महिला महापौर खुल्या प्रवर्गातून म्हणजेच ओपन कॅटेगरीमधील असेल असं आरक्षणाच्या सोडतीमधून स्पष्ट झालं आहे. खुल्या प्रवर्गातून मुंबईचा महापौर होणार असल्याने दोन महिलांची नावं चर्चेत आहेत. या दोन महिला महापौर कोण जाणून घ्या…
तेजस्वी घोसाळकर –
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तेजस्वी घोसाळकरांनी डिसेंबर महिन्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्या प्रभाग 2 मधून निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून 16 हजार 484 मतांसहीत दणदणीत विजय मिळवला. 2017 मध्ये त्या शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग 1 मधून विजयी झाल्या होत्या.
अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी 2025 मध्ये हत्या झाली होती, ज्यानंतर तेजस्वी यांनी राजकीय जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. त्यांचे कुटुंब उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते, परंतु डिसेंबर 2025 मध्ये तेजस्वी यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. विकासकामांसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राजश्री शिरवडकर –
भाजपच्या महिला मोर्चाच्या मुंबई महासचिव असलेल्या राजश्री शिरवडकर यांचं नावही महापौर पदाच्या शर्यतीत आहे. राजश्री शिरवडकर या भाजपचे पदाधिकारी राजेश शिरवडकर यांच्या पत्नी आहेत. 2017 मध्ये राजश्री शिरवडकर मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 172 (सायन-माटुंगा) मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या. त्यांनी 13,731 मते मिळवून एकूण मतांपैकी 59.80% मतांसहीत विजय मिळवला. राजश्री शिरवडकर कमिटी सदस्याही राहिल्या आहेत. त्या स्टँडिंग आणि वर्क्स कमिटी सदस्या होत्या. तसेच महिला आणि बाल कल्याण समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा प्रभाग क्रमांक 172 (सायन-माटुंगा) मधून निवडणूक लढवली. त्यांनी ठाकरेंच्या पक्षाच्या मधुरी भिसेंना पराभूत करत पुन्हा या प्रभागात भाजपाचा झेंडा फडकवला.
अलका केरकर –
अलका केरकर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या संघाशी संबंधित आहे. यापूर्वीही त्या नगरसेविका राहिल्या आहेत. जुन्या किंवा संघाशी संबंधित नगरसेविका महापौर होण्याची जास्त शक्यता आहे. नवीन निवडून आलेले तसेच बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना कमी संधी देणार असं गृहित धरलं तर तेजस्वी घोसाळकरांऐवजी अलका केरकरांना संधी मिळू शकते.
