प्रेयसीवर केलेल्या एका टिप्पणीमुळे किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात होऊन मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कळमना पोलिस स्टेशन हद्दीतील पार्वतीनगर परिसरात घडली. या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तरुणांमधील वाढते मद्यपान आणि हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मृत तरुणाचे नाव ऋतिक सावनलाल पटले (वय 22) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना पार्वतीनगर चौकात घडली. ऋतिक पटले हा आपल्या मित्र तनसू शिवप्रसाद नागपुरे सोबत घराबाहेर बसून गप्पा मारत होता. त्यावेळी परिसरात राहणारा त्यांचा मित्र मुस्तफा उर्फ गोलू अंसारी तिथे आला आणि दोघांना दारू पिण्यासाठी सोबत चलण्याचा आग्रह केला. पैसे नसल्याचे सांगून दोघांनी नकार दिला, मात्र तरीही मुस्तफाने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून बिनाकी मंगळवार कांजी हाऊस चौकात नेले, जिथे तिघांनी दारू प्यायली.
दारू पिल्यानंतर परत येताना पैशाच्या कारणावरून ऋतिक आणि मुस्तफा यांच्यात वाद झाला. याच दरम्यान ऋतिकने चेष्टेच्या उद्देशाने मुस्तफाच्या प्रेयसीबद्दल टिप्पणी केली. यामुळे संतप्त झालेल्या मुस्तफाने शिवीगाळ करत दोघांना रस्त्यातच उतरवले आणि तो निघून गेला. वाद मिटवण्यासाठी ऋतिक, तनसू आणि त्यांचा मित्र सलीम अंसारी पार्वतीनगर चौकात गेले. मात्र तिथे परिस्थिती अधिकच चिघळली.
मुस्तफा, त्याचा भाऊ, त्याचे वडील ईशा हातिम अंसारी, तसेच लुकमान अंसारी, साहिल अंसारी, सलाउद्दीन अंसारी आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून ऋतिकवर हल्ला चढवला. चाकू व लोखंडी रॉडच्या साहाय्याने केलेल्या या सुनियोजित हल्ल्यात ऋतिकच्या डोक्यावर जबर मार लागला आणि तो जागीच कोसळला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात तनसू नागपुरे, सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.
