नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले

ज्या आई-वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षित वाटायला हवे, तिथेच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुलगा चुकीचे वागत असल्याच्या कारणावरून नागपुरातील एका दाम्पत्याने आपल्या १२ वर्षांच्या मुलाला गेल्या तीन-चार महिन्यांपासून साखळी आणि कुलपाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालकांचा अजब तर्क

हे आई-वडील मोलमजुरी करतात. दिवसभर घरी कोणी नसल्याने मुलगा चुकीचे वागतो, असा दावा करत त्यांनी त्याला क्रूर शिक्षा देण्यास सुरुवात केली. पालकांकडून मुलांना अशी अमानुष वागणूक का देण्यात आली असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. कामावर जाताना मुलाचे हात-पाय साखळीने बांधून त्याला कुलूप लावले जायचे आणिकामावरून परतल्यावरच त्याला सोडले जायचे. सलग काही महिने हा प्रकार सुरू असल्याने मुलाच्या हाता-पायांवर जखमा झाल्या आहेत.

अशी झाली मुलाची सुटका

‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’ वर मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो मुलगा अत्यंत भयभीत आणि थरथर कापणाऱ्या अवस्थेत आढळला.

पालकांवर होणार कारवाई 

याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात निर्दयी पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिस पालकांची चौकशी देखील करत आहेत.

नेमकं काय चुकतं? 

पालकांनी देखील मुलांच्या त्यांच्या मनाप्रमाणे विचार करायला हवा. कारण मुलांची मानसिकता समजून घेत संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पालकांच्या अशा वागण्याने मुलांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो. हा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *