भांडूप पश्चिम येथे रेल्वे स्थानक परिसरातील बस्ट बसचा थांबा आहे. यामुळे नेहमीच येथे बस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. 29 डिसेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. बेस्टच्या MH 01, CV 6515 या क्रमांकाच्या इलेक्ट्रीक बसने 11 प्रवाशांना चिरडले आहे. बस मागे घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस गर्दीत घुसली. रात्रीची वेळ असल्यामुळे स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होती त्यावेळी ही घटना घडली आहे. बस खाली येऊन दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.
तपासात काय उघड झाले?
या अपघाताची सखोल चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाला आहे.
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस चालक संतोष सावंत याने आधी बसचा एक फेरा पूर्ण केला होता. त्यानंतर तो बस दुसऱ्या फेऱ्यासाठी सुरू करत असताना ही दुर्घटना घडली. यामुळे चालकाचा हा दावा खोटा ठरतो की, आधीच्या चालकाने बस ड्राइव्ह मोडमध्ये ठेवून हँड ब्रेक ओढलेला होता.
चालकाच्या कोणत्या चुकीमुळे अपघात झाला?
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सीलेटर दाबला, त्यामुळे बस अचानक उडी मारून पुढे गेली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक बसली. पोलिसांनी स्पष्ट केले की, चालकाने सुरुवातीला दुसऱ्या चालकावर आरोप करून तपास यंत्रणेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चौकशीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, अपघातासाठी पूर्णपणे चालकच जबाबदार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चालकाला अटक केली असून, त्याला शनिवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच बसमध्ये कोणतीही तांत्रिक बिघाडाची समस्या नव्हती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष सावंत हा BESTचा कायमस्वरूपी कर्मचारी असून, त्याला जवळपास 20 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव आहे. मात्र, तो गेल्या तीन महिन्यांपासूनच इलेक्ट्रिक बस चालवत होता. अनुभवी चालकाकडून झालेल्या या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे
