उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पुढच्या मिनिटाला त्याचा मृत्यू; मिरा-भाईंदर महापालिकेत असं काय घडलं?

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले जावेद पठाण यांचा अर्ज भरल्यानंतर काही क्षणातच मृत्यू झाला. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या पठाण यांची अचानक प्रकृती खालावली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांवर येणारा मानसिक आणि शारीरिक ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याशिवाय यामागे काही दुसरं कारण आहे का? अशी शंका देखील वर्तवली जात आहे.

मीरा रोडच्या नया नगर भागात राहणारे 66 वर्षीय जावेद पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे ते मंगळवारी हेटरी चौक येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी शांतपणे आपला उमेदवारी अर्ज भरला आणि कार्यालयाबाहेर पडले.

मात्र, अर्ज भरून बाहेर आल्यानंतर काही क्षणातच जावेद पठाण यांची प्रकृती अचानक बिघडली. उपस्थित लोकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि अधिकऱ्यांना मोठा धक्का बसला.

राजकीय पर्श्वभूमी
जावेद पठाण हे परिसरात नावजलेलं व्यक्तिमत्त्व असून सामाजिक आणि राजकीय कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर घडलेली ही दुर्दैवी घटना त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि समर्थकांसाठी मोठा आघात ठरली आहे. या घटनेनंतर निवडणूक कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत पुढील प्रक्रिया सुरळीत केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

मानसिक ताणतणावाचा मुद्दा गंभीर 
निवडणूक ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया असली, तरी त्यामागील धावपळ, ताणतणाव आणि वेळेचा दबाव उमेदवारांच्या आरोग्यावर परिणाम करत असल्याचे या घटनेतून दिसून येते. जावेद पठाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, ती निवडणूक प्रक्रियेत मानवी बाजू किती संवेदनशील आहे हे अधोरेखित करते. त्यांच्या निधनामुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून, अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *