पत्नीची प्रसूती झाल्याने तिच्यासह नवजात बाळाला पाहण्यासाठी जात असताना दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली. या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
श्रीकांत नागोराव रामगडे (३६) रा. भिसनी असे मृताचे नाव आहे. पांढरकवडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भिसनी येथील श्रीकांत यांची पत्नीला प्रसूतीसाठी पांढरकवड्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. याविषयीची माहिती मिळताच श्रीकांत हे आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन पांढरकवडा येथे निघाले. सोमवारी सायंकाळ झाली असल्याने अंधार पसरला होता. वाटेत ट्रॅक्टर उभा असताना दिसून आला नाही. परिणामी श्रीकांत यांची दुचाकी त्यावर धडकली. या अपघातात श्रीकांत यांच्या डोक्याला जबर मार लागला. मुलगाही जखमी झाला. हे पाहताच नागरिक धावून आले. त्यांनी बापलेकांना पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच श्रीकांत यांचा मृत्यू झाला होता. पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
आनंदाचे क्षण दु:खात बदलले
श्रीकांत यांना मुलगा झाल्याचे कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. गावातील साऱ्यांना ही आनंदवार्ता दिली. घरातील नव्या पाहुण्याला पाहण्याची ओढ वाढू लागली. सायंकाळ झाली असतानाही त्यांनी दुचाकीने पांढरकवड्याच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत उभ्या ट्रॅक्टरने घात केला. दुचाकी त्यावर धडकली आणि श्रीकांत यांचा मृत्यू झाला. आनंद ओसंडून वाहणाऱ्या घरात दु:ख पसरले.
