नव्या वर्षाचा (2026) आजचा पहिला आहे. नवीन सुरुवात होताच महागाईचा फटका बसला आहे. 1 जानेवारीला सरकारने महत्वपूर्ण आणि रोजच्या वापरातल्या गोष्टीची किंमत वाढवली आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 111 रुपयांची वाढ जाहीर केली असून ही वाढ आजपासून लागू झाली आहे. हे 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीतील वाढ आहे. कमर्शियल सिलेंडर महाग झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच छोट्या व्यावसायिकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
कसे आहेत नवीन दर?
नव्या दरांनुसार, दिल्लीत 19 किलोचा कमर्शियल एलपीजी सिलेंडर आता 1,691.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत 1,580.50 रुपये होती. कोलकात्यात हा सिलेंडर 1,795 रुपयांचा झाला असून पूर्वी 1,684 रुपये होता. मुंबईत कमर्शियल सिलेंडरची किंमत आता 1,642.50 रुपये आहे, जी आधी 1,531 रुपये होती.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल?
दरम्यान, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की घरगुती गॅसच्या दरांमध्ये स्थिरता कायम ठेवण्यात आली आहे. सध्या देशातील बहुतांश शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 850 ते 960 रुपयांच्या दरम्यान आहे. दिल्लीत हा सिलेंडर 853 रुपये, मुंबईत 852.50 रुपये, लखनऊमध्ये 890.50 रुपये, अहमदाबादमध्ये 860 रुपये, हैदराबादमध्ये 905 रुपये, वाराणसीमध्ये 916.50 रुपये आणि पटण्यात 951 रुपयांना मिळत आहे.
इंडियन ऑइलच्या अधिकृत माहितीनुसार, पटण्यात 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 1,953.50 रुपयांना मिळणार आहे. नोएडामध्ये त्याची किंमत 1,691 रुपये, लखनऊमध्ये 1,814 रुपये, भोपाळमध्ये 1,696 रुपये आणि गुरुग्राममध्ये 1,708.50 रुपये इतकी झाली आहे.
कशा ठरतात किंमती?
एलपीजी सिलेंडरच्या किंमती ठरवताना अनेक घटकांचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसचे दर, डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च, विमा तसेच विविध कर यांचा समावेश इम्पोर्ट पॅरिटी प्राइस (IPP) मध्ये केला जातो. याशिवाय, प्रत्येक राज्यातील कररचना आणि वाहतूक खर्च वेगवेगळा असल्यामुळे एलपीजीच्या किमती राज्यागणिक बदललेल्या दिसून येतात.
