48 तास महत्त्वाचे! जोरदार पाऊस की काडाक्याची थंडी? काश्मीरपासून कोकणापर्यंतचा हवामान अंदाज

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट सक्रिय नसली तरीही तापमानाचा आकडा मात्र 10 अंशांहून कमीच असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होऊन थंड वारे वाहण्यास सुरुवात होते, तर दिवसा मात्र सूर्य डोक्यावर आल्यानंतर असह्य उकाडा पाहायला मिळतो अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळते. प्रामुख्यानं किनारपट्टी भागांमध्ये ही स्थिती कायम असून, मुंबईसह कोकणामध्ये यामुळं दुपारच्या वेळी नागरिकांची होरपळ होताना दिसत आहे.

राज्याच्या कोणत्या भागात थंडीचा कडाका वाढणार? 

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीच्या लाटेचा इशारा नसला तरीही गारठा मात्र गायम असणार आहे. तर, राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादरही दीर्घकाळ टीकून राहणार असल्यानं त्याचा दृश्यमानतेवर परिणाम होणार आहे. राज्यात नीचांकी तापमानाचा सरासरी आकडा 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहणार असून, प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रत ही कडाक्याची थंडी पाहायला मिळेल.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात तापमानात पुढचे दोन दिवस 1 ते 2 अंशांची घट अपेक्षित आहे. तर, उर्वरित राज्यात मात्र तापमानाचा आकडाक फारसा बदलणार नसून चार दिवसांसाठी हीच स्थिती कायम असेल. त्यामुळं एकिकडे थंडीचा बचाव करताना दुसरीकडे उन्हाशी झुंज देण्यासाठीसुद्धा नागरिकांनी सज्ज रहावं हेच खरं.

देशभरातील हवामानाचा अंदाज…. ऊन, वारा, पाऊस आणि बर्फ… 

वर्षाच्या अखेरीस हवामानाचे तालरंग कसे असतील याबाबतची माहिती आणि पूर्वानुमान केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं दिली असून, पुढच्या 5 दिवसांसाठी उत्तर भारतात धुक्याची चादर असेल असा अंदाज आहे. दृश्यमानतेवर याचा परिणाम होणार असल्यामुळं वाहतूक व्यवस्था, विमानसेवा आणि रेल्वेसेवांवर याचा परिणाम होणार आहे.

पश्चिमी हिमलाय क्षेत्रात येणाऱ्या जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 29 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान हाडं गोठवणारी थंडी असेल. तर, याच भागांमध्ये पर्वतीय क्षेत्रांवर पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. ज्याचे परिणाम मैदानी क्षेत्रातील तापमानाच होणाऱ्या बदलांमध्ये दिसेल. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा इथं धुक्यामुळं जनजीवन विस्कळीत होईल. तर, दक्षिण भारतामध्येही ढगाळ वातावरण असलं तरीही पावसाचा अंदाज नसून इथंही तापमानात घट अपेक्षित असल्याचा इशारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *