देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये फसवणूक करणारी व्यक्ती गुजरातची असल्याचं समोर आलं आहे. गुजरातमधील या व्यक्तीने मुंबईतील एका वृद्ध महिलेला हा गंडा घातल्याचं उघड झालं आहे.
नेमका कुठे घडला हा प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून 68 वर्षीय मुंबईकर वृद्धेची पावणेचार कोटींना फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक झाली आहे. या प्रकरणातील पीडित महिला ही अंधेरी पश्चिम भागात राहते.फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तो मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवले. बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी घेत एकाने स्वतःची ओळख न्यायमूर्ती चंद्रचूड सांगितली होती, असं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे.
दोन महिन्यांपासून सुरु होती फसवणूक
पीडित महिलेला मनी लॉन्डरिंग प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगत सतत तिच्यावर नजर ठेवली होती. हा सारा प्रकार जवळपास दोन महिने सुरु होता. 18 ऑगस्ट ते 13 ऑक्टोबरदरम्यान आरोपीने या महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवलं होतं. 18 ऑगस्ट रोजी महिलेला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने ती कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत पीडित महिलेला तिच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची माहिती कुणालाही सांगू नये, अशी धमकी देत त्याने फसवणूक करणाऱ्याने पीडितेकडे बँक तपशील मागितल्याची माहिती असे अधिकाऱ्याने घटनाक्रम सांगताना दिली..
निबंध लिहून घेतला
नंतर फसवणूक करणाऱ्या या आरोपीने पुढील तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. स्वतःची ओळख एस. के. जैस्वाल अशी करुन देणाऱ्या आरोपीने महिलेकडून एक निबंधही लिहून घेतला. पीडित महिलेकडून आरोपीने तिच्या आयुष्यावर दोन ते तीन पानांचा निबंधही लिहून घेतला. त्यानंतर हाच निंबंध पाहून तिच्या निरपराधतेची खात्री झाल्याचे सांगत तिला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचं सांगितलं अन्…
यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीसमोर हजर केले. या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘न्यायमूर्ती चंद्रचूड’ अशी करून दिली. या महिलेला गुंतवणुकीची माहिती पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले गेले. यामुळे तिने दोन महिन्यांच्या कालावधीत विविध बँक खात्यांमधून एकूण 3 कोटी 75 लाख रुपये या व्यक्तींच्या खात्यांवर वळते केले.
पोलिसांकडे केली तक्रार पण तोपर्यंत झालेला उशीर
मात्र हा सारा प्रकार फसवणुकीचा असल्याचं समजेपर्यंत फार उशीर झाला होता. तिला याची जाणीव झाल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. डिजीटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधील एकाला या प्रकरणात अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
