Year End 2025 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेकांचीच पावलं सध्या विविध पर्यटनस्थळांच्या दिशेनं वळत आहेत. काहींना लांबलचक सुट्टी असल्यानं लांबच्या प्रवासाचे बेत आहे, तर काही मंडळींना मात्र दोनचार दिवसांचीच सुट्टी असल्यानं एखाद्या छानशा आणि जवळच्याच ठिकाणी जाण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळत आहे. वर्षअखेर, नाताळ, नव्या वर्षाची सुरुवात असे एकंदर दिवस पाहता सहसा पर्यटकांचा ओघ हा गोवा आणि तत्सम ठिकाणांकडे दिसून येत आहे. मात्र तरीही गोव्यावर सरशी करत मुंबई नजीकच्या एका ठिकाणानं बाजी मारत पर्यटकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इथं झालेली गर्दी पाहता तरी असं म्हणणं गैर ठरणार नाही, हे ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि नजीकचा परिसर.
पर्यटकांची रायगडच्या किनाऱ्यांना पसंती
निसर्गाचं वरदान लाभलेलं कोकणही आता पर्यटकांच्या पसंतीस उतरलंय. सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनारयांची निवड केलीय . नव्या वर्षाच्या स्वागताचं सुरू झालं असून पर्यटकांच्या गर्दीनं रायगडचे किनारे हाऊसफुल्ल झाले आहेत.
अथांग निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या बागा आणि शहरापासून नजीत शांततेचा अनुभव देणाऱ्या या भागांमध्ये समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. नाताळसारखी सुट्टी म्हटली की मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडतील या किनार्यांकडे पर्यटकांची पावले आपोआप वळतात यंदा हा आकडा तुलनेनं अधिकच असल्याचं पाहायला मिळालं.
अलिबाग, किहिम, काशिद, नागाव, चिकनी, मुरूड , दिवेआगर , हरिहरेश्वरचे किनारे सध्या गर्दीने फुलून गेले आहेत. मागील पाच दिवसात तब्बल चार लाखांहून अधिक पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांना भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडी मंडळीही खुश आहेत.
सुट्ट्यांच्या या माहोलातून इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतात. नव्या वर्षात नव्याने सुरूवात करण्यासाठी नवीन उमेद मिळवण्यासाठी रायगडचे किनारे म्हणजे फेवरीट डेस्टीनेशन आहे . चमचमीत शाकाहारी बरोबरच जीभेचे चोचले पुरवण्यासाठी ताज्या मासळीचा आस्वाद इथं पर्यटक घेत आहेत. मुख्य म्हणजे पर्यटकांच्या आगमनाने येथील छोटेमोठे व्यावसायिकही सुखावले आहेत.
किनारपट्टीवरील सर्वच हॉटेल, लॉजेस फुल्ल झाले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स बरोबरच पार्टी, डीजे मनोरंजनाच्या खेळांचं आयोजन व्यावसायिकांकडून केलं जातं आहे. इतकंच नव्हे तर, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारपट्टीवरील नगरपालिकांनी पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं आहे, ज्यामुळं अलिबाग गोव्याला टक्कर देतंय असं म्हणायला हरकत नाही.
