अवयवदानाने सहा जणांना जीवदान, ठाण्यातील ब्रेन डेड महिलेच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय

मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित झालेल्या 38 वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा जणांचे प्राण वाचले आहेत. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही ठाण्यातील एका कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सहा रुग्णांना आवश्यक अवयवांचे प्रत्यारोपण होऊ शकणार आहे. ठाण्यातील ही पहिलीच घटना ठरली असून ठाणे, मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आहेत.

कुटुंबाकडून अवयवदानाचा निर्णय

हाजुरी येथील रहिवासी असलेल्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे 19 डिसेंबर रोजी महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. 25 डिसेंबर रोजी डॉक्टरांनी महिलेला ‘ब्रेन डेड’ घोषित केले. या कठीण काळात डॉक्टरांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यावेळी कुटुंबीयांनी आपल्या भावना बाजूला सारून समाजाप्रति असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.

सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान, सहा जणांचा जीव वाचण्यास मदत

26 डिसेंबर रोजी डॉ. विनीत रणवीर आणि त्यांच्या चमूने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये यकृत, दोन मूत्रपिंड (किडनी), हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस या सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला होता. ठाण्याहून पवईपर्यंत 17 मिनिटांत या महिलेचे हृदय पोहोचवून एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले.

मृत महिलेल्या मुलीला दोन लाखांचा धनादेश

पाच अवयव मुंबईत, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. महिलेच्या या उदात्त कार्याचा सन्मान म्हणून जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे त्यांच्या 9 वर्षीय मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख, असे एकूण दोन लाख रुपयांच्या एफडीचा (मुदत ठेव) धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान होणे गरजेचे असते. नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती झाल्यास अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती या रुग्णालयाचे डॉ. विनीत रणवीर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *