मेहंदी सजली, हळद लागली; मुंबईकर वधूचा नाशिकच्या रिसॉर्टमध्ये मृत्यू, गोडबोले कुटुंबावर शोककळा

हळदीच्या दिवशीच चक्कर येऊन वधूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक शहरात रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले असे २९ वर्षीय मयत वधूचे नाव आहे. त्या मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहत होत्या.

नेमकं काय घडलं?

दीपशीखा यांचा विवाह गंगापूर गावापासून जवळच एका आलिशान रिसॉर्टमध्ये होणार होता. यासाठी वऱ्हाड मुंबईहून दाखल झाले होते. मात्र हॉटेलमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या.

दीपशीखा यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले. तेथे डॉ. गांगुर्डे यांनी दीपशिखा यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

लग्नाचा मंडप सजलेला असतानाच बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपशिखा यांच्या हाताला मेहंदी सजली, संगीत सोहळाही पार पडला, मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कशामुळे मृत्यू झाला?

लग्नमुहूर्तासाठी तयार होत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची दगदग यामुळे प्रकृती वरखाली होत असल्याचा समज करुन त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या आणि गोंधळ उडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *