शीतलहरींना रोखणं अशक्य; महाराष्ट्राच्या दिशेनं येतेय कडाक्याच्या थंडीची लाट… आरोग्य जपा!

उत्तरेकडे हिमवृष्टीमध्ये तुलनेनं काहीशी घट झाली असली तरीही इथं वाहणाऱ्या शीतलहरींच्या वाटेत मात्र कोणताही अडथळा नसल्यामुळं या थंडीचा परिणाम देशात सर्वदूर पाहायला मिळत आहे. पूर्वोत्तर भारतापासून ते अगदी दक्षिण भारतामध्येसुद्धा थंडीचा कडाका वाढत असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला असून, वर्षाचा शेवटही हा थंडीच्याच हजेरीसह होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

किमान तापमानाचा आकडा

उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा थेट परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावरही दिसत आहे. राज्यात प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर तामपानात घट नोंदवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून पहाटेपर्यंत गारठ्याचे तास असून, सूर्य डोक्यावर आल्यानंतर मात्र हा दाह सोसेनासा होत आहे. अर्थात पुन्हा सूर्य मावळतीला गेल्यानंतर गार वारा थंडीची चाहूल देऊन जात आहे. ज्यामुळं होरपळणाऱ्या या शहरात इतकी थंडीसुद्धा नागरिकांना सुखावणारी ठरत आहे. . शुक्रवारी मुंबईत किमान तापमानाचा आकडा 16 अंश सेल्सिअस इतका होता तर राज्यातील इतर भागांमध्ये हाच आकडा 10 ते 12 अंशापर्यंत घसरल्याचं पाहायला मिळालं.

हवामान विभागानं पुढील 48 तासांसह वर्षातील या अखेरच्या आठवड्यासाठी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम असून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही ही थंडी हजर असणार आहे.  ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार नववर्षाची सुरुवात थंडीनं होईल आणि त्यानंतर तापमानात काही अंशांची वाढ होईल.

अपेक्षित हिमवृष्टी झालेली नाही, तरी…

सध्या हिमालय आणि आसपासच्या क्षेत्रात अपेक्षित हिमवृष्टी झालेली नाही. तर, तिथं उत्तराखंड किंवा हिमाचलमध्ये मात्र बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं देशाच्या इतर भागांमध्ये गारठा वाढण्याची आणि कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उत्तर भारतातील या राज्यांसह उत्तर आणि ईशान्य भारतात ही थंडी येत्या दोन दिवसांत रौद्र रुप धारण करणार आहे. ज्यामुळं पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातही थंडीचा कडाका वाढत असून या भागांमध्ये दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारण आठवडाभर हा इशारा कायम राहणार असून, नागरिकांना या सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.

किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

जेऊर  – 8.5
गोंदिया- 9.4
नाशिक- 9.6
मालेगाव- 9.8
नागपूर- 10.6
सातारा- 11
महाबळेश्वर- 11.7
मुंबई- 18

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *