झटपट पटापट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर बायकोशी वाजलं, 24 तासात जोडपं वेगळं, पुण्यात ऐतिहासिक काडीमोड

प्रेमविवाह म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी असते, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, पुण्यातील एका उच्चशिक्षित जोडप्याच्या बाबतीत हा अनुभव पूर्णपणे उलटा ठरला आहे. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सुरू झालेल्या वादामुळे हे दाम्पत्य विभक्त झाले. विशेष म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अवघ्या ८ दिवसांत त्यांना घटस्फोट मंजूर करण्यात आला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

काय आहे प्रकरण?

घटस्फोट झालेले हे दाम्पत्य समाजातील प्रतिष्ठित वर्गातील आहे. पती एका जहाजावर (शिप) मोठ्या पदावर कार्यरत आहे, तर पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. मोठ्या अपेक्षेने या दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या २४ तासांत पतीच्या कामाच्या स्वरुपावरुन नवरा-बायको दोघांमध्ये खटके उडू लागले. वादाची ठिणगी इतकी मोठी होती की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटावर शिक्कामोर्तब

३ डिसेंबर रोजी या जोडीने वकील अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सामान्यतः घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी अनिवार्य असतो, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, जर पती-पत्नी १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतील, तर हा कालावधी शिथिल केला जाऊ शकतो. हे दाम्पत्य दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्यामुळे आणि पतीला तातडीने नोकरीसाठी परदेशी जाणे आवश्यक असल्याने न्यायालयाने १० डिसेंबर रोजी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.

वैचारिक मतभेद टोकाला

विभक्त राहण्याच्या काळात दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे मन वळवण्याचा आणि संसार पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, वैचारिक मतभेद टोकाला गेल्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र येण्यास नकार दिला. अखेर कायदेशीररीत्या नाते संपवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मान्य करत त्यांनी हा निर्णय घेतला. वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर अगदी क्षुल्लक कारणांवरून सुखी संसाराला लागलेली ही गळती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *