मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे. जी तीन मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि आठ कामगार ढिगा-याखाली अडकले. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय.
27 जुलै 2023ला या ऍडमिन बिल्डींगला रेकॉर्ड प्लॅन नुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाचं उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुस-या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का? असा प्रश्न बांधकाम विभागाकडे विचारला असता, पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलं. त्यामुळे वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे यातून स्पष्ट झालं.
