सोलापुरात विवाहबाह्य संबंधातून एका विवाहित तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर पत्नीचं अफेअर पतीला कळलं यावरून दोघांमध्ये खटके उडायचे. त्यानंतर पत्नीच्या प्रियकरानं मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या विवंचनेतून मोहोळ तालुक्यातील यावळी येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. संजय राजाराम राऊत (वय 26) असं मयत तरुणाचं नाव आहे.
‘कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेतला’
‘पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली’ अशी फिर्याद मयताच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे (रा.कोंडी, ता. उत्तर सोलापूर) या दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल शुक्रवार रोजी घडली. दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणानं एवढं टोकाचं पाऊल उचलल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोनच महिन्यापूर्वी संजयचा विवाह
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय 26) याचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला होता. विवाह झाल्याबरोबर काही दिवसातच पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण संजयला लागली होती. संजय राऊत आणि त्याच्या पत्नीत खटके उडू लागले होते. प्रियकर सौरभ शिंदेला माहिती होताच त्यानेही संजय राऊत याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली, अशा आशयाची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात संजय राऊत याचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी दिली आहे. ‘माझ्या मुलाची पत्नी व तिचा प्रियकर सौरभ शिंदे याचे प्रेमसंबंध होते. मुलाच्या मरणास त्याची पत्नी व सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) हे दोघेजण कारणीभूत आहेत’, असं या फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान, संजयच्या अचानक जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर मयत संजयचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. आपल्या मुलाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वडिलांच्या या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत.
