इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

मुलुंड पश्चिम स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एम. जी. रोडवर एका बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ थांबवून ठेवली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. अन्य वाहन चालकांनी याचा जाब विचारताच, बस चालकाने गैरवर्तन केले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे बेस्टच्या संबंधित आगारप्रमुखांना मुजोर चालकाच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

गजबजलेल्या रस्त्यात शेवपुरीसाठी बस थांबवली

बेस्ट बस चालकाने मुलुंड एम. जी. रोडवर शेवपुरी पार्सल घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी भररस्त्यात बस थांबवली. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. खाद्यपदार्थ हातात मिळेपर्यंत बस उभीच राहिल्याने मागे उभे असलेल्या अन्य वाहन चालकांनी हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. तसेच, या बेजबाबदार वर्तनाबद्दल जाब विचारला असता, बेस्ट बस चालकाने अपशब्द वापरल्याचा त्यांचा आरोप आहे. हा सर्व प्रकार एका वाहन चालकाने मोबाइलमध्ये कैद केला.

मुलंडमधील अत्यंत गजबजलेला ‘एमजी रोड’ हा रस्ता प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि परिसरातील व्यावसायिक क्षेत्रांशी जोडणारा एक मुख्य मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच बसमुळे या भागात मोठा ट्राफिक जाम झाला. हा प्रकार घडला, त्यावेळी बस रिकामी होती, त्यात कोणतेही प्रवासी नव्हते. त्यामुळेच चालक-वाहकावर कुठला दबाव नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *