पोलीस अधिकाऱ्यांचा त्रास, घरातील महिलांचा छळ करतात’

पोलीस रेकॉर्डवर असलेल्या एका तरुणाने पोलीस आपल्याला व कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा व्हिडिओ बनवत आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तपासासाठी पोलीस सतत घरी येऊन घरातील महिला व नातेवाईकांना जाणीवपूर्वक अर्वाच्य भाषेत बोलत असल्याच्या त्रासाला कंटाळून निलंगा तालुक्यातील औराद येथे तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवला

निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी येथे धक्कादायक घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहनचालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून इम्रान बेलुरे (वय 20) या युवकानं आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत गळफास घेतला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. इम्रान बेलुरेवर चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत असत. रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यानं पोलीस सातत्यानं त्याचं लोकेशन तपासत होती.

घरातल्या महिलांना त्रास

मृताच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, एक वर्षांपूर्वीच्या प्रकरणातून वारंवार घरात येऊन त्रास देणे, घरातील महिलांना छळणे, तसेच मध्यरात्री गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेणे असे प्रकार सुरू होते. काल गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान तेरणा नदीकाठी झाडीत इम्रानने संबंधितांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करत व्हिडीओ केला. घटनेनंतर औराद पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तरुणाला एकट्यात गाठत निर्घृणपणे संपवलं

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू व काठीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून, चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *