राज आणि उद्धव या ठाकरे बंधुंनी आगामी पालिका निवडणुकीसाठी आपली युती जाहीर केली. यावेळी ठाकरे बंधुंनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी रावसाहेब दानवेंबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ठाकरे बंधुंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते त्या पातळीचे नाहीत. त्यांना पक्षात कोणं विचारतं का? असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक खेचून घेत दानवेंवर काय बोलायचं? असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला. या सर्व पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले रावसाहेब? सविस्तर जाणून घेऊया.
8 वर्षानंतर दोन भावांनी आपापसातलं भांडण मिटवलं याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट घडली. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. निवडणुकीनंतरही त्यांनी एकत्र राहावं, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवेंना पक्षात कोण विचारत? असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर रावसाहेब यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांना इतकी गोष्ट लागायचे कारण नाही. 2019, 2024 च्या निवडणुका, आता नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर त्यांची परिस्थिती पाहून मी बोललो. मीपण 35 वर्षे आमदार आहे. मला परिस्थिती कळते. या पक्षात फार उमेदवार निवडून येणार नाही. 2 आकडी संख्याही यांची आली नसल्याचे रावसाहेब म्हणाले.
मला पक्षाने 21 व्या वर्षी सभापती केलं, 5 वेळा खासदार, केंद्रात 2 वेळा मंत्री केलं, 21 ते 68 वर्षापर्यंत मी कधीच खाली गेलो नाही. माझी पक्षातील ही किंमत आहे. पण यांची औकाद काय? काळा बुरखा घालून मागच्या दारात विधानपरिषदेत गेले आणि अडीच वर्षे राज्य करता आले नाही. मी वाघ आहे. पुढच्या दारानं डरकाळ्या देत जातो. मागच्या दारानं शेपूट घालून विधानपरिषदेत जात नाही. निवडणूक का लढत नाही? तुमची पक्षात काय उरली? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असा टीका त्यांनी रावसाहेब दानवेंवर केली.
एकत्र पत्रकार परिषद चालली असताना दुसरीकडे यांचे कार्यकर्ते सोडून चालले. मी कोणाचं नाव घेतलं नाही. पक्ष अस्तित्वात राहणार नाही असं म्हटलं. यांनी माझं नाव घेतलं. मी राज्यभर प्रचार करत फिरलो. त्यामुळे मला यांची परिस्थिती कळली, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
