नेपाळहून कोकणात कामाला निघाले, सर्वजण साखरझोपेत, भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात

राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण देखील वाढत आहे. असाच एक भीषण अपघात अंबा घाटात आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास झाला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. यात असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बसमधील 15 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाहीय. अपघात होताच तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. आज भल्यापहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

50 प्रवासी असल्याची माहिती…

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावर अंबा घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबा घाट चक्री वळणावर ही घटना घडली असून बस 70 फूट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 50 प्रवासी असल्याचं म्हटलं जात आहे. अपघात झालेल्या बसला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत.

बसचा चक्काचूर

सुदैवाने बस 70 फूट दरीत कोसळली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बसमधील 15 प्रवासी किरकोळ जखमी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बस दरीत कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनंतर साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

काळ आला होता पण वेळ नाही!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे येथील पर्यटकांना घेऊन जाणारी एक मिनीबस रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बायपासवर उलटल्याने 10 जण जखमी झाले होते. दि. 2 डिसेंबर मंगळवारी रोजी 12 ते 12:30 च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणेकरांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *