कॉलेजच्या चुकीच्या कारभारामुळे 133 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागलं आहे. हा प्रकार संभाजीनगरमधील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये घडलाय. हे विद्यार्थी कॉलेजमध्ये हॉल तिकीट घेण्यासाठी पोहोचले. मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनची पायरी गाठली आहे.
एमसीएच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी परीक्षेला मुकलेत. यामध्ये या विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नाही. ज्या कॉलेजमध्ये हे शिकत होते त्या कॉलेजचा हा हलगर्जीपणा आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले मात्र विद्यापीठात ते भरलेच नाही. विद्यापीठांची सलग्नता नव्हती आणि त्यामुळे हॉलतिकीट मिळू शकले नाही. अखेरच्या क्षणी या साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजने विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी ते पसार झाले आणि विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान झालं. अखेर नुकसान झालेल्या सगळ्या विद्यार्थी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांना झी मीडियाच्या टीमने फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी थातूरमातूर उत्तर देत त्यांनी वेळ मारुन नेली. पोलिसांनीही कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधवांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही ते सापडले नाहीत.
साई इन्स्टिट्यूट कॉलेजची पोलखोल आता विद्यापीठाने केलीय. मूलभूत पायाभूत सुविधा नसलेले हे कॉलेज आहे. याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे.
विद्यापीठाची या कॉलेजला संलग्नता नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्याचा प्रश्न नसल्याचे विद्यापीठ सांगत आहे. मग या कॉलेजला प्रवेश झाले कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. प्रवेश झालेत, पैसेही घेतले, आता विद्यार्थीही परीक्षेला मुकलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला जबाबदार कोण.. या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
