नागरिकांचा प्रवास विनाअडथळा होणार, महामार्गावर टोलसाठी थांबायची गरज नाही; नितीन गडकरींनी सांगितला मास्टरप्लान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. सध्या अस्तित्वात असलेली टोल कलेक्शन सिस्टिम एक वर्षांच्या आत कालबाह्य होणार असून त्याजागी एक नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टम आणण्यात येणार आहे. यामुळं महामार्गावर आता ब्रेक न घेता वाहनचालकांना प्रवास करता येणार आहे. लोकसभेत प्रश्न-उत्तराच्या तासात नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.

सध्याची टोल कलेक्शन सिस्टिम ही एका वर्षात टप्याटप्याने बंद केली जाणार आहे. त्याजागी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणली जाईल. ही नवीन प्रणाली 10 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत देशभरात तिचा विस्तार केला जाणार आहे. तसंचदेशभरात सध्या 10 लाख कोटी रुपयांचे 4,500 महामार्ग प्रकल्प सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) प्रोगॅम राबवला आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी हा एक एकीकृत प्लॅटफॉर्म आहे. जेणेकरुन भारतात महामार्गावर टोल कलेक्शन करण्याची प्रक्रिया सोप्पी होईल. NETCचा महत्त्वाचा भाग FASTag असून हे गाडीच्या विंडस्क्रीनवर लावण्यात आलेला एक रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन बेस्ड डिव्हाइस आहे. टोल बुथवर थांबल्यानंतर युजरच्या अकाउंटमधून आपोआप टोलची रक्कम वजा होते.

दिल्लीतील प्रदूषण लक्षात घेता आता सरकार पर्यायी इंधनांना प्राधान्य देत असल्याचे सांगून आपण स्वतः टोयोटा ‘मिराई‘ हायड्रोजन इंधन कारचा वापर सुरू केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे ते म्हणाले. मिराई हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ भविष्य असा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कॅशलेस उपचार

रस्ते अपघातात पीडितांना कॅशलेस उपचारांतर्गत एकूण 6.833 पैकी 5.480 पीडित पात्र ठरले असून सुमारे 20 टक्के प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. या योजनेंतर्गत रस्ते अपघातांतील दुर्घटनांत पीडितांवर 1.50 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार केले जाणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग 2026मध्ये सेवेत

एप्रिल 2026 आधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरींनी दिली आहे. लोकसभेत ठाकरे सेनेचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी हे उत्तर दिलं आहे. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *