महाराष्ट्रातील 80 हजार शाळा आज बंद, लाखो विद्यार्थी घरी बसणार; काय कारण? जाणून घ्या

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांवर आज घरी बसण्याची वेळ येणार आहे. कारण राज्यातील 80 हजारहून अधिक शाळा आज बंद राहणार आहेत. शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. वेतन कपात होऊनही शिक्षक मागे हटण्याच्या मनात नाहीत. हा बंद यशस्वी झाल्यास शासनाला धोरण बदलावे लागण्याची शक्यता मोठी आहे. काय आहे कारण? सविस्तर जाणून घेऊया.

शिक्षक संघटना 2024 च्या नव्या “संच मान्यता धोरणा”ला आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला कडवा विरोध करत आहेत. या धोरणामुळे हजारो शाळांमध्ये फक्त 1-2 शिक्षकच राहतील, विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होईल, असा संघटनांचा दावा आहे. म्हणून राज्यातील सुमारे 80 हजार सरकारी व खासगी अनुदानित शाळा आज पूर्ण बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शिक्षक आमदारांचा पाठिंबा

हा बंद फक्त एका संघटनेचा नाही, असे म्हणत विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनीही बंदला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिक्षक विरुद्ध शासन असे थेट आमने-सामने चित्र निर्माण झाले आहे.

एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश

माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी बंद करणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा स्पष्ट आदेश काढला आहे. तरीही शिक्षक संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “वर्षातून दोनदा टीईटी आणि संच मान्यतेवर तात्पुरती स्थगिती देऊनही शिक्षकांचा रोष कमी झालेला नाही.

शिक्षकांची भूमिका काय?

आज राज्यभर शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयांसमोर शिक्षक मोठ्या संख्येने जमून निवेदने देणार आहेत. शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आदी सर्व प्रमुख संघटना एकत्र आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षकांचे हक्क वाचवण्यासाठी हा लढा असल्याचे ते म्हणत आहेत.

शासन काय म्हणते?

आता वर्षातून दोनदा टीईटी घेतली जाईल आणि संच मान्यतेवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिक्षकांनी विधायक सूचना दिल्यास शासन नक्कीच विचार करेल पण शिक्षकांना हे पुरेसे वाटत नाही, त्यांना धोरण पूर्णपणे रद्द हवे आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *