कापसाच्या शेतात गांजा, वाऱ्याने दुर्गंधी पसरली अन्…; महाराष्ट्रात कुठं घडलं 1 कोटींचं हे विचित्र प्रकरण?

गांजाची शेती ऐकूनच डोळे चक्रावतात. महाराष्ट्रात एके ठिकाणी चक्क एका शेतात हा गांजा लावण्यात आला आणि तो विकण्यासाठीची तयारीसुद्धा करण्यात आली. पुढं नेमकं काय घडलं? याचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस कारवाईनंतर समोर आला आहे. जालन्यातील अंबड पोलिसांनी धाड टाकून एक कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. शेतात लावलेल्या गांजाची काढणी करून तो सुकवण्यासाठी शेतात ठेवलेला असल्याची माहिती जालन्यातील अंबड पोलिसांना मिळाल्यानंतर या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून सुमारे 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला.

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कपाशीच्या शेतात हा गांजा लावण्यात आला होता. ही कारवाई जालना शहरातील दहशतवादविरोधी पथक आणि अंबड पोलिसांनी संयुक्तपणे केली. अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात ही कारवाई झाली. यात एकूण 4 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला. गांजा काढून तो सुकवण्यासाठी शेतात ठेवला होता. यामुळे दूरपर्यंत गांजाची दुर्गंधी पसरली होती. या ठिकाणाहून 60 वर्षीय ढवळीराम बारकू चरावंडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

जालन्यातून आणखी एक घटनादायक वृत्त समोर… 

तिथं शेतात गांजा लावल्याच्या घटनेची चर्चा असतानाच जालन्यातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथून जालना शहराकडे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हे वाहन पकडून पोलिसांना माहिती देऊन ताब्यात घेण्यात आलं आहे. यात सात गोवंश आणि एक गाय आढळून आली आहे. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *