राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू, दोन महिने लपवली माहिती? नेमकं चाललंय काय?

मुंबईकरांचं फिरण्यासाठी आवडतं ठिकाण असणाऱ्या भायखळ्यातील राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर प्राणी संग्रहायलय प्रशासनाने माहिती जाहीर केली नव्हती. 17 नोव्हेंबरलाच शक्ती वाघाचा मृत्यू झाला होता. तसाच काहीसा प्रकार दुसऱ्या वाघाच्या बाबतीतही झाल्याची शंका आहे.

राणीबागेतील आणखी एक वाघाचा मृत्यू

राणीबागेतील आणखी एक वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर पालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. राणीबाग प्रशासनाने तब्बल दोन महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा केला आहे.

ऑक्टोबर महिन्यातच वाघाचा मृत्यू झाला होता. मग  दोन महिने मृत्यू का लवपला? असा प्रश्न नितीन बनकर यांनी विचारला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शक्ती वाघाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबरला संशयास्पदरित्या मृत्यू झाला. तो दहा वर्षांचा होता. वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.   वाघाचे फुफ्फुसं 90 टक्के खराब झाले होते. मात्र आठ दिवस वाघाच्या मृत्यूची माहिती लपवण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे.

वाघाला पहिल्यांदा 16 नोव्हेंबरला झटके यायला लागले होते. 17 नोव्हेंबरला उपचार करण्याआधीच अचानक फिट आली आणि मृत्यु झाला पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून ‘शक्ती’ वाघ आणण्यात आला होता.  त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. आता त्याची पूर्ण वाढ झाली होती. त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात असताना आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *