पुणे-माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला आहे. अवघड वळणावर चालकाचे नियत्रंण सुटल्याने थार गाडी 500 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी पुण्याकडून माणगावकडे जात असताना हा अपघात झाला. सध्या अपघात झालेल्या ठिकाणी माणगाव पोलीस आणि विविध बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. सर्व मयत तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
ड्रोनच्या मदतीने शोध सुरु
अपघातग्रस्त थारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त थारमध्ये आणखी प्रवासी असण्याची शक्यता लक्षात घेवून ड्रोनच्या सहाय्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. गाडीत एकूण किती जण होते हे स्पष्ट झालेलं नाही. माणगाव पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून अपघातग्रस्त वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील काही जण सोमवारी या गाडीने फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. परंतु ते घरी परत आले नाहीत म्हणून पुण्यातील पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती.
तुटलेल्या कठड्यामुळे अपघाताबद्दल समजलं
हे सर्वजण पुण्याहून निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर ताम्हिणी घाटात काही अपघात झाला आहे का याचा शोध माणगाव पोलिसांचं पथक गस्त घालत असताना एका अवघड वळणावर रस्त्यालगतचे बॅरीगेटस तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलीसांना संशय आल्याने त्यांनी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता खोल दरीत ही गाडी आणि मृतदेह आढळून आले आहेत. अपघात रात्रीचा किंवा पहाटेचा असल्याने कोणालाही त्याची लगेच कल्पना आली नाही. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला सकाळी गाडी दरीत दिसल्यावर बातमी समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सगळे पुण्यातील तरुण होते असं सांगितलं जातंय. थारची अवस्था पाहता आतून कोणीही वाचणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे.
मृतांची नावं:
सूरज सुनील शहा (वय 23, पुणे)
प्रशांत पाटील (वय 24)
रोहन शहा (वय 22)
चौथा मृतदेह आढळला असला तरी त्याची ओळख अजून पटलेली नाही.
ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसांत पावसाचं प्रमाण कमं झालं असलं तरी रस्ते अजूनही निसरडेच आहेत. अवघड वळणं ओव्हरस्पीडींमुळे या घाटात असे अनेक अपघात होतात. त्यामुळे अशा ठिकाणी गाड्या चालवताना अधिक काळजी घेतली पाहिजे.
