देशाच्या पूर्वोत्तर राज्यांसह उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश इथं बर्फवृष्टीमुळं मैदानी भागांमध्येसुद्धा तापमानात मोठी घट होत असून, उत्तरेकडून वाहणाऱ्या या शीतलहरींचा परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. जिथं राज्यातही पारा 6.5 अंशांपर्यंत खाली आला आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून, जेउर इथं 7.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मागील 24 तासांतील हे सर्वात कमी तापमान ठरलं. तर, गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रात धुळ्यात पारा 6.5 अंशांवर गेला आणि राज्यात थंडीचा कडाका नेमका किती वाढला आहे याचीच प्रचिती आली.
सध्याच्या घडीला महाबळेश्वरपेक्षा अधिक कडाक्याची थंडी निफाड, नाशिक या भागांमध्ये पडल्यानं आता तापमानातील ही घट अशीच सुरू राहणार की या थंडीला ब्रेक लागणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघरमध्येसुद्धा रात्रीच्या वेळी किमान तापामान 20 ते 17 अंशांदरम्यान असून पहाटेच्या वेळीसुद्धा गारठा टिकून असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुपारच्या वेळी मात्र सूर्याचा तडाखा अधिक जाणवत असल्यानं ही थंडी अचानक दडी मारताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये तापमानातील हे बदल स्थिर राहणार असून, थंडीती तीव्रता शहरी भागांमध्ये अंशत: कमी दिसून येईल. राज्यातील घाटमाथ्यावर धुक्याची चादर असल्यानं दृश्यमानतेवर याचा परिणाम होताना दिसेल ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.
सोलापूर गारठलं…
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर येथे काल राज्यातील सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर गुरुवारीसुर्धा जेऊरमध्ये अशीच परिस्थिती आहे. थंडी सुरू झाल्यानंतर मागील काही दिवसापासून जेऊर मधलं तापमान हे सगळ्यात कमी असं नोंदवलं जात आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी काही ठिकाणी ग्रामस्थ शेकोट्या पेटवून उबदार वातावरण तयार करत आहेत. या हिवाळ्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर हे गाव कमी तापमानामुळे चर्चेत आलेलं आहे.
छत्रपती संभाजीनगरात यंदा थंडीचा दर दिवशी नवा रेकॉर्ड होताना दिसत आहे. 10 दिवसांत इथं किमान तापमान तीन अंशांनी घसरलं असून, शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. नोव्हेंबर महिन्यात रोज किमान तापमान घसरण्याचा रेकॉर्ड होतो आहे. मंगळवारी दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, तर कमाल तापमान 27.7 अंशांवर होते. काल किमान तापमान 10.5 अंशावर गेले. कमाल तापमान 30.2 अंशांवर होते. या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान काल नोंदविले गेले. सकाळी थंड वाऱ्यासह हुडहुडी भरते आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे, तर सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. 22 ते 23 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
