मुलगी प्रियकरासोबत पळाली; आईने उचललं टोकाचे पाऊल, नातेवाईकांनी बॉडी नेली थेट पोलिस ठाण्यात, नेमकं प्रकरण काय?

उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. 20 वर्षीय विवाहित तरुणी पूजा ही प्रियकरासोबत घर सोडून पळून गेल्यानंतर, तिच्या आईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता, वेळेत कारवाई न झाल्याचा आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेने संतापलेल्या नातेवाइकांनी मृतदेह थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणून ठेवला. अखेर प्रियकर आणि त्याच्या नातेवाइकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

मुलीचे विवाहबाह्य संबंध

आई रेखा राजू जाधव वय 50, रा. राम मंदिर, उस्मानपुरा असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलीचा तीन वर्षांपूर्वी पहिला विवाह झाला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे घटस्फोट झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी गेल्या वर्षी मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. मात्र, लग्नानंतरही मुलगी प्रियकराच्या संपर्कात होती. आठ दिवसांपूर्वी मुलगी पतीच्या घरी न सांगता प्रियकरासोबत पळून गेली. ही बाब लक्षात येताच रेखा जाधव यांनी तात्काळ उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी तक्रार नोंदवली नाही. उलट, कारवाईसाठी 50 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *