शेतकऱ्याने शाळेत गुपचूप CCTV कॅमेरा लावला, सोलापुरातील शिक्षकाचं भयंकर कृत्य उघडकीस; कोर्टाकडून थेट जन्मठेप!

सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी हा निकाल दिला असून एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या शिक्षकाचं बिंग फुटलं आहे. न्यायालयाने शेतकरी आणि डॉक्टरांच्या साक्षी ग्राह्य धरून हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील एका शाळेत धनाजी सोपान इंगळे हा 48 वर्षीय शिक्षक शिकवत होता. तो वर्गात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करत होता. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या शिक्षकावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. शाळेच्या बाजूला शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिक्षकाचं वर्तन संशयास्पद वाटलं. त्याने दोन-तीन दिवस शिक्षकावर पाळत ठेवली. 15 एप्रिल 2023 रोजी, शेतकऱ्याने आपल्या भावाच्या मदतीने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं कैद झालं.

शेतकऱ्याने हे सीसीटीव्ही फुटेज मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि काही पालकांना दाखवले. फुटेज पाहून शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघडकीस आलं. शेतकऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उल्लेख करताच, धनाजी इंगळेने स्वतःहून चूक कबूल केली आणि माफी मागितली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर, त्यांनी शिक्षकाने तीन-चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं.

दरम्यान, याप्रकरणी एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या दहशतीमुळे आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे पालक जबाबासाठी कोर्टात आले नाहीत. त्यांनी ‘आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही’ असे लिहून दिले. तरीही, पोलिसांनी धीर देऊन गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *