महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने 15 कोटी रुपयांचे सोने तस्करी आणि वितळवण्याचे रॅकेट उघड केले आहे. या रॅकेटचं कनेक्शन दुबई, कोल्हापूर आणि सांगलीपर्यंत आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सोने वितळवण्याच्या सुविधांचा पर्दाफाश करून 15 कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केला आहे. या प्रकरणात 11 जणांना अटक केल्यानंतर सिंडिकेटच्या मुख्य सूत्रधाराने दुबई, कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधील संपर्क आणि ग्राहकांकडून तस्करीचे सोने मिळवल्याचे उघड झाले आहे.
खोटा स्टॅम्पही मारला
सोने मिळाल्यानंतर ते वितळवले गेले. त्यामध्ये भेसळ केली गेली आणि अनधिकृत कार्यशाळांमध्ये त्याचे अवैध मूळ लपवण्यासाठी आणि पुनर्ब्रँडेड सोने विकण्यासाठी “व्हीएस गोल्ड” आणि “आरजी” चिन्हांकित करून भारतीय बारमध्ये रूपांतरित केले गेले. हा सारा फसवणुकीचा मोठा घोटाळा आता समोर आला आहे.
तस्करीचा मागील रेकॉर्ड
डीआरआय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोन्याची तस्करी, वितळवणे आणि बेकायदेशीर विक्रीमध्ये सहभागी असलेल्या 11 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोन्याच्या तस्करीचा मागील रेकॉर्ड असलेल्या मास्टरमाइंडचाही समावेश आहे. हे सिंडिकेट मास्टरमाइंड त्याच्या वडिलांच्या, व्यवस्थापकाच्या, चार भाड्याने घेतलेल्या मेल्टर्स, तस्करी केलेल्या सोन्याच्या नोंदी राखण्यासाठी जबाबदार असलेल्या अकाउंटंट आणि त्याचे वितरण करणारे तीन डिलिव्हरी कर्मचारी यांच्याशी संगनमताने चालवत होता.
किती सोनं जप्त केलं?
सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एजन्सीने 15 कोटी रुपये किमतीचे 11.88 किलो सोने आणि 13.77 लाख रुपये किमतीचे 8.77 किलो चांदी जप्त केली आहे. एस.एस. जोशी, ए.एस. केसरकर, व्ही.व्ही. कदम, पी. कुमार, एन.व्ही. ठक्कर, एस. जोशी, एस.सी. नरळे, व्ही. ठक्कर, व्ही. एच. रबारी, एस.पी. त्रिपाठी आणि एस.पी. राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुढील तपास सुरु
सोन्यासारख्या मौल्यवान धातूला वितळण्यासाठी अत्यंत उच्च तापमान आणि विशेष प्रक्रियांची आवश्यकता असते. ही प्रक्रिया केवळ प्रशिक्षित व्यावसायिक आणि योग्य सुरक्षा उपकरणांसह नियंत्रित वातावरणातच करणं अपेक्षित असतं. मात्र या नियमांचीही पायमल्ली करण्यात आली आहे. वेगवगेळ्या गुन्ह्यांखाली या आरोपींना अटक करण्यात आली असून ते हे सारं कधी पासून करत होते. यामध्ये इतर राज्यांशी काही कनेक्शन आहे का या गोष्टींचा शोध आता पोलीस घेत आहेत.
