पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे! टोळक्यांनी सीसीटीव्ही फोडले, हातात मोठी शस्त्रे घेत मुक्त संचार; दहशतीने नागरिक हैराण

पुण्यातली गुन्हेगारी सध्या नागरिकांसाठी नाहक त्रास देणारी ठरत आहे. आता पुण्यातले गुंड टोळक्याने मुक्त संचार करत आहेत. ते कायदा मानायला तयार नाहीत. त्यांनी कोणालाही न जुमानता बिनधास्तपणे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. याशिवाय हे गुन्हेगार आता हातात मोठमोठे शस्त्रे घेऊन परिसरातून रात्री उशिरा उनाडक्या करताना दिसत आहेत. पण या सगळ्याप्रकारामुळे नागरिक मात्र दहशतीच्या छायेखाली जगताना दिसत आहेत, कारण भरदिवसा खून करणे असो किंवा दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले होणे असो, मागच्या काही दिवसांतील घटना पाहता पुण्यामध्ये हे चित्र आता सर्वसाधारण झाले आहे, असे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे.

दरम्यान, पुण्यात वाढती गुन्हेगारी, टोळी युद्ध आणि अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कोथरूडमधील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली होती. परंतु, त्या बैठकीला आठवडा उलटत नाही तोच कोथरूडमध्ये पुन्हा टोळक्यांनी दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे.

सुतारदरा परिसरातील गणेश कॉलनी भागात काही टवाळखोर युवकांनी हातात धारदार कोयते घेत, तोंडावर मास्क लावून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ ते दहा युवक एकत्र फिरत असून, परिसरातील कॅमेरे मुद्दाम फोडताना दिसत आहेत. हातात मोठी शस्त्रे घेऊन हे युवक मुक्तपणे फिरत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याचे आता या घटनेवरून दिसत आहे.

१० नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी संबंधित टोळक्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *