टाटा पॉवरने मुंबईच्या परळमध्ये देशातील सर्वात अनोखे भूमिगत सबस्टेशन सुरू केलं. हे 400 kVA क्षमतेचं सबस्टेशन गेल्या 9 महिन्यांपासून सुरु आहे. यंदाच्या मुसळधार पावसात रस्त्यावर 4-5 फूट पाणी साचलं तरी एक क्षणही वीज गेली नाही. कारण हे सबस्टेशन पूर्णपणे पाण्यात बुडालं तरी काम करतं. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कसं शक्य झालं?
विशेष सबमर्सिबल ट्रान्सफॉर्मर असून पाण्यात 100% सुरक्षित आहे. टाटा पॉवरचं पेटंट असलेलं कनेक्टर मोबाईलवरून रिमोटने चालवता येतं. एक बटण दाबलं की सगळं कंट्रोल होतं. म्हणूनच हे सबस्टेशन ‘देखभाल शून्य’ आहे. यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागत नाही.
वरचा भाग पार्किंगसाठी
सबस्टेशन खाली आहे वर रस्ता किंवा पार्किंग आहे. म्हणजे मुंबईतली मौल्यवान जागा वाया जात नाही. परळच्या रहिवाशांना आता वीज आणि पार्किंग दोन्ही मिळालं आहे. रस्त्यावर मोठे खांब-तारांचे जाळेही नाही. त्यामुळे शहर सुंदर दिसतंय!
पुढच्या 4 वर्षांत 100 सबस्टेशन!
परळमधलं यश पाहून टाटा पॉवरने मोठा डाव टाकला आहे. 2029 पर्यंत मुंबईत अशी 100 हून अधिक भूमिगत सबमर्सिबल सबस्टेशन उभी करणारआहेत. दादर, वरळी, अंधेरी, कुर्ला अशा सगळीकडे पावसाळ्यात ‘लाइट गेली’ ही तक्रार कायमची बंद होणार आहे. व्होल्टेजही नेहमी स्थिर राहणार आहे. या यशस्वी प्रयोगामुळे आता पावसाळ्यात “लाइट गेली रे!” म्हणायची वेळ संपलीय. टाटा पॉवरचं नवं सबस्टेशन म्हणजे मुंबईचं ‘वॉटरप्रूफ पॉवर हार्ट’ आहे.
