राज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?

नोव्हेंबर महिन्यामध्ये अखेर महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळ्यानं जोर धरल्याचं पाहायला मिळालं. राजस्थान, मध्य प्रदेशापासून अगदी जम्मू काश्मीर आणि हिमाचल, उत्तराखंडमध्येही  थंडीचा कडाका वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. मध्य भारतापासून उत्र भारत आणि उत्तर पूर्व भारतामध्ये वाढणारा थंडीचा कडाका महाराष्ट्रावरही परिणाम करताना दिसत आहे. जिथं, राज्यातील उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या किमान आकड्यात आणखी घट होईल असं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली असून, पुढील 24 तासांमध्ये हवामान कोरडं राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, निफाड, धुळे इथं गारठा वाढला असून, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची दाट चादर असल्यामुळं इथंसुद्धा झोंबणाऱ्या थंडीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह शहरातील उपनगरीय भागांमध्येसुद्धा गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. तुलनेनं दक्षिण महाराष्ट्र आणि एकंदर दक्षिण भारत मात्र इथं अपवाद ठरताना दिसत आहे, जिथं तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत.

राज्यात एकिकडे हिवाळा दर दिवसागणिक जोर धरताना दिसत असल्यामुळं अनेकांनी आतापासूनच हिवाळी सहलींचे बेत आखण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात थंडीचे हे दिवस सातत्यानं असेच राहणार असून, त्यात तापमानात आणखी घट अपेक्षित असल्यानं राज्यातील गिरीस्थानांकडेही अनेकांची पावलं वळताना दिसत आहेत.

तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कमाल आणि किमान)

पुणे – 29.4/ 13.4
धुळे- 30.0/ 8.0
कोल्हापूर – 28.7/ 16.9
महाबळेश्वर- 25.3/ 12.5
नाशिक- 29.4/ 10.7
मुंबई – 32.0/ 18.4

देशभरातही थंडीचा कहर… पाहा प्राथमिक अंदाज…. 

केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या प्राथमिक माहितीनुसार तामिळनाडू, केरळ आणि माहे इथं पुढील 24 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव सुरू राहिल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचलच्या स्पितीचं खोरं आणि मनालीमध्ये जोरदार हिमवृष्टी अपेक्षित असून उत्तराखंडमध्ये प्रामुख्यानं चमोली, नैनीताल, मसूरी इथं शीतलहर आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *