पुणे, महाबळेश्वरपर्यंतच्या मोक्याच्या जमिनींचे नामी-बेनामी मालक पार्थ यांचे पिताश्री आहेत. त्यांच्या रक्तात जमीन भिनली आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांना जमिनी गिळण्याची भूक लागली आहे, तर या अजगरांना ‘क्लीन चिट’ देण्याचा रोग मुख्यमंत्र्यांना जडला आहे,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे.
हे जनतेला नव्याने समजले…
“फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात चौकशीआधीच संशयित आरोपीला ‘क्लीन चिट’ देऊन मुख्यमंत्री फडणवीस मोकळे झाले. आता पुण्यातील मुंढवा येथील जमिनीचे प्रकरण बाहेर आले व गाजावाजा झाला तेव्हा ‘कोणालाही सोडणार नाही’ असा नेहमीचा दम मुख्यमंत्र्यांनी भरला. म्हणजे त्यांनी काय केले? कृषी खात्याची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल करून तहसीलदार वगैरेंना तडकाफडकी निलंबित केले. इतका मोठा व्यवहार तहसीलदारांसारख्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात असतो हे महाराष्ट्रातील जनतेला यानिमित्ताने नव्याने समजले,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही
“बरे झाले, महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडली! ज्या ‘अमेडिया’ कंपनीच्या माध्यमातून मुंढवा येथील जमिनीचा व्यवहार झाला त्या कंपनीचे 99 टक्के मालक चिरंजीव पार्थ आहेत, पण एक टक्का शेअर असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करून फडणवीस सरकारने चिरंजीवांना ‘क्लीन चिट’ दिली. क्लीन चिट देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही. आधी ए.टी.एस. चौकशी समिती नेमायची व काम सुरू होण्याआधीच क्लीन चिट द्यायची. मुख्यमंत्र्यांनीच क्लीन चिट दिल्यावर त्या एटीएसचा काय उपयोग?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
फडणवीस राज्य चालवीत आहेत की ‘काझी कोर्ट’?
“गेल्या वर्षभरात फडणवीस यांनी जितक्या गुन्हेगारांना जाहीर क्लीन चिट दिली ते पाहिल्यावर जनतेला प्रश्न पडतोय की, हे महोदय राज्य चालवीत आहेत की एखादे ‘काझी कोर्ट’! काझी कोर्टात निवाड्याचे प्रकार याच पद्धतीने चालतात,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला.
एखाद्या माथेफिरूने मंत्रालयात घुसून…
ठाकरेंच्या शिवसेनेनं, “क्लीन चिट देण्याआधी अजित पवार, प्रफुल पटेल, तटकरे वगैरे मंडळी फडणवीसांना भेटली व आम्ही जमिनीचा व्यवहार रद्द केला, असे जाहीर केले हे महत्त्वाचे. हा कोणता नवा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे? चोराने मुद्देमाल परत केला तर ‘क्लीन चिट’ मिळते, हा संदेश समाजात जाणे घातक आहे. एखाद्या माथेफिरूने मंत्रालयात घुसून एखाद्या भ्रष्ट बोक्यावर संतापाच्या भरात सपासप वार केले व पोलिसांनी गुन्हा दाखल करताच हत्यार परत केले तर त्याच्यावरील गुन्हे माफ होणार काय?” असा खोचक सवाल विचारला आहे.
हा पायंडा पडला तर…
“मुद्देमाल परत दिला की गुन्हा संपतो, हा पायंडा पडला तर सगळेच गुन्हेगार ‘माल परत केलाय ना’ याच मुद्द्यावर सुटत राहतील. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य राहिलेले नाही याचा हा पुरावा. महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते भयंकर, तितकेच चिंताजनक आहे,” असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
