5 नाही आता 10 लाख रुपये मिळणार! महाराष्ट्रातील 3.44 कोटी लोकांना होणार फायदा; जाणून घ्या सविस्तर

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट दुप्पट करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा होण्याच्या काही तास आधीच मंत्रिमंडळाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून याचा फायदा आयुष्यमान कार्ड असलेल्या सर्वांना होणार आहे. म्हणजेच सध्या महाराष्ट्रात आयुष्यमान कार्ड काढलेल्या 3 कोटी 44 कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. या योजनेतील नवीन अपडेट काय आहे आणि त्याचा लाभ कसा घेता येईल जाणून घेऊयात…

पाच लाख रुपयांवरून दहा लाख रुपये

सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता गंभीर आजारांवरील उपचारांसाठी 10 लाख रुपये तरतूद आरोग्य विभागाने केली आहे. महात्मा फुले योजनेंतर्गत असलेली ही मर्यादा पाच लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करण्यात आली आहे. याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून 2399 उपचारांपैकी 223 उपचार शासकीय रुग्णालयांमध्ये राखीव ठेवण्यात आले आहेत.

 

सध्याची पद्धत बंद होणार

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समिती नेमण्यात आली होती. या योजनेअंतर्गत एकूण 2399 उपचारांपैकी 223 उपचार शासकीय रुग्णालयांकरिता राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांच्या श्रेणीनुसार पॅकेज दर अदा करण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे.

नवी पद्धत काय?

त्याऐवजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे दर तसेच राज्याच्या उपचारांचे निश्चित केलेले दर बेस पॅकेज रेट म्हणून लागू करतील. त्यानुसार अंगीकृत रुग्णालयांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत उपचार व त्यांचे दर यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नियामक परिषदेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समग्र उपचारांची यादीतील अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन एकूण उपचारांची संख्या निश्चित करणे, उपचारांच्या संख्येत, वर्णनात व दरात बदल करणे, शासकीय राखीव उपचारामध्ये भर घालणे किंवा कमी करणे, अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव उपचार खासगी रुग्णालयांना खुले करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना देण्यास मंजुरी देण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार केवायसी केलेल्या कार्डामागे 20 रुपये आणि कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी राज्याने 204 कोटी 6 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. विस्तारित योजनेत राज्यातील 12 कोटी 74 लाख लाभार्थ्यांपैकी 9 कोटी 30 लाख आयुष्यमान कार्ड शिल्लक आहेत. हे उद्दिष्टये 100 टक्के साध्य करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानचालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना दर कार्डामागे असे वाढीव मानधन देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *