मुलीच्या हातावरील मेहंदीत असं काही दिसलं की बापाने घरातच पाडला रक्ताचा सडा; सूनेला म्हणाला ‘मी हिला मारलंय, आता…’

एका 17 वर्षीय मुलीची तिच्या वडिलांनीच अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ही घटना घडली आहे. बापाने मुलीला तिच्या प्रियकराशी बोलताना रंगेहाथ पकडल्यानंतर आणि तिच्या हातावरील मेहंदीत प्रियकराचं नाव लिहिल्याचं लक्षात आल्यानंतर संतापाच्या भरात हत्या करुन टाकली. हत्येनंतर त्याने सुनेला आपण मुलीची हत्या केल्याची माहिती दिली आणि घटनास्थळावरुन पसार झाला.

ही घटना रोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूतनेरा गावात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी त्याचा मुलगा, सून आणि अल्पवयीन मुलीसह येथे राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी त्याचा मुलगा कामावर गेला होता, तर सून घराबाहेर कपडे धुत होती. त्याची मुलगी घरात एकटी होती. ती फोनवर तिच्या कथित प्रियकराशी बोलत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरात आला तेव्हा त्याने मुलीला फोनवर प्रियकराशी बोलताना पकडलं. संतापाच्या भरात ओरडल्यानंतरही मुलीने मात्र फोनवर बोलणं सुरु ठेवलं होतं. यामुळे त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात त्याने काठी उचलली आणि तिला निर्दयीपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला. तिचं रडणे ऐकून तिची वहिनी आत धावली. पण ती आत पोहोचली तेव्हा मुलगी मृतावस्थेत पडलेली आढळली. मुलीच्या मृत्यूनंतरही आरोपी बापाचा राग शांत झाला नव्हता. त्याने सूनेला सांगितलं की, “मी माझ्या मुलीला मारलं आहे आणि हे मी सर्वांना ओरडून सांगणार आहे”. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.

तपासात आढळून आलं की, मुलीचे त्याच गावातील आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिने हातावर काढलेल्या मेंहदीत त्याचं आणि आपं नाव लिहिलं होतं. तसंच हृदयाचे चिन्ह काढलं होते, जे तिच्या वडिलांनी हत्येच्या काही क्षण आधी पाहिलं होतं.

कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी त्या तरुणाशी लग्न करण्यावर ठाम होती. तिच्या वहिनीने सांगितलं की, “ती तिच्या वडिलांशी अनेकदा वाद घालायची आणि तिला जे काही करायचे ते करेन असे म्हणायची. ती त्याच्याशी फोनवर बोलायची आणि सर्वांना सांगायची की ती, माझा जीव गेला तरी त्याच्याशी लग्न करणार आहे”.

मुलगी वारंवार विनंती करत असल्याने तिच्या भावाने तिचे लग्न त्या तरुणाशी निश्चित करण्यास सहमती दर्शवली असली तरी, आरोपीने लग्नाला तीव्र विरोध केला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोबाईल फोन जप्त केले. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की मुलगी इतर काही तरुणांच्या संपर्कात होती ज्यामुळे तिचे वडील आणखी संतापले होते.

पोलिस अधीक्षक (एसपी) राजेश द्विवेदी म्हणाले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. “आमच्याकडे त्याच्या ठावठिकाण्याबाबत ठोस पुरावे आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल,” असं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *