अस्तंबा यात्रेवरुन परत येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. नंदुरबारमधील चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी भीषण दृश्य पाहायला मिळाले. जखमी आणि मृत अपघातस्थळी बराच काळ पडून होते. त्यानंतर बचावकार्याला वेग आला आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
कसा झाला अपघात?
अस्तंबा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. चांदशैली घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चांदशैली घाटात अनेक वळणं असून अपघातप्रवण क्षेत्र मानले जाते.
पिकअप अपघातात दहापेक्षा अधिक भाविक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मदत कार्य वेगाने सुरु करुन जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
भीषण बस अपघातात १२ जण जखमी
दुसरीकडे,रामगड येथे NH-33 वर एका भीषण अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. रांचीहून कोडरमाकडे जाणाऱ्या बसला एका ट्रेलर ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या धडकेत बस आणि ट्रक दोन्ही उलटल्यामुळे NH-33 वर वाहतूक कोंडी झाली. जखमींना रामगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) परमेश्वर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार “बस कोडरमाकडे जात होती तेव्हा मागून एका ट्रेलर ट्रकने तिला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहने उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.”
