बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेली तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिचा पाय आणखी खोलात अडकला आहे. पूजाचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला.
जिल्हा सरकारी वकील ऍड प्रदीपसिंग राजपूत यांनी बार्शी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. संशयित आरोपी पूजा गायकवाड हिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा प्रकारच्या घटनांना खतपाणी मिळेल, असं त्यांनी सांगितलं. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीतर्फे अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच व बांधकाम व्यवसायिक गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख प्रेमसंबंधात रुपांतरित झाली होती. या नात्याचा फायदा घेत पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडून महागडे मोबाईल, बुलेट, सोने, वैराग (ता बार्शी) येथील प्लॉट, तसेच नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन इत्यादी संपत्ती मिळवली आहे.
गोविंद बर्गे यांनी गेवराई (बीड) येथे बांधलेल्या आलिशान बंगला आपल्या नावावर करून घेण्याचा तगादा लावला होता. हा बंगला तिच्या नावावर न केल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिने बर्गे यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या सततच्या छळामुळे वैफल्यग्रस्त होऊन गोविंद बर्गे यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी सासुरे (वैराग ता बार्शी जि सोलापूर) येथे पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर गोविंद बर्गे यांचा मेव्हणा लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला. तिला १० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
जिल्हा सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद
पूजा गायकवाड हिच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी सरकारी पक्षातर्फे तीव्र विरोध नोंदवत जोरदार युक्तिवाद केला. संशयित आरोपी पूजाला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना खतपाणी मिळेल. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला
